वाजतगाजत लग्न करून नववधू आली कि महिना - दोन महिन्यांतच तिला हळूहळू कानावर येऊ लागतं, कि आता पेढे कधी देण्याचा विचार आहे?
ज्या घरात ती मुलगी जन्मते , वाढते ते स्वत:चे घर सोडून ती नवीन घरात प्रवेश करते. तेथील माणसांशी, प्रत्यक्ष नवऱ्याशी जुळवून घेण्यासाठी तिला वेळ हवा असतो. तिथल्या पद्धती तिला समजून घ्यावयाच्या असतात . बऱ्याच वेळा तिचे शिक्षण पूर्ण झालेले नसते. नव्या पिढीनुसार तिचा जॉब, व्यवसाय लग्नानंतर बदललेला असतो. त्यामुळे त्यातच गर्भधारणेसारखी आयुष्यातील अतिशय महत्वाची जबाबदारी तिच्यावर लगेच टाकू नये.
घरात बऱ्याच वर्षात लहान मुल नाही. आजूबाजूच्या मुलांना मुलं झाली, आजी आजारी आहे. एकदा मुल झालं कि माहेरची माणसं सुटली, गर्भधारणा लांबणीवर टाकली की मुल होत नाही, असा गैरसमज. अनेक कारणांनी गर्भधारणा लवकर व्हावी म्हणून त्या मुलीवर दबाव आणला जातो.
वैद्यकीय शास्त्रानुसार लग्नानंतर एक वर्ष गर्भधारणा होण्याची वाट बघावी. दोघांच्यात काही दोष नसला तरी एक वर्ष गर्भाधार्नेस लागू शकतो.
गर्भ एकदि जाणीवपूर्वक रहायला हवा. नको असतांना अगदी लवकर गर्भ राहिला तर पहिला उद्गार असतो नको मला इतक्या लवकर. मग आयुष्यात जे बाळ आयुष्यभर साथ देणारे, आपला नावलौकिक पुढे उजळवणारे असते त्याचे असे नकारार्थी स्वागत करायचे का?
बाजारातून एखादी वस्तू विकत घेताना आपण किती चोखंदळ असतो. सगळ्यात उत्तम दर्ज्याची, टिकाऊ वस्तू आपल्याला हवी असते. मग आपले मुल या जगात आणतांना काहीही विचार न करता आणावे का? ते मुल जगात आणणारी स्त्री शारीरिक व मानसिकदृष्ट्या सबळ करून मगच मुल होऊ देण्याचा विअचार आपण करायला हवा. मुलगी जेव्हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रगल्भ झालेली असेल तेव्हाच गर्भधारणा होऊ द्यावी.
अलीकडच्या काळात स्त्री शिक्षणामुळे लग्न उशिरा होतात त्यामुळे एक वर्ग असा असतो की तो सर्व सेटल झाल्यावर मुलाचा विचार करतो. अति उशिरासुद्धा गर्भधारणा चांगली नसते. वाढत्या वयाबरोबर आईचे व मुलाचे सुद्धा प्रोब्लेम वाढतात. सर्वसाधारण पहिले मुल २५ वयाच्या दरम्यान व दुसरे ३० च्या पर्यंत तरी होऊन द्यावेत.
गर्भधारणा करण्यापूर्वी मुलीने व मुलाने आपापले हिमोग्लोबिन, रक्तगट, एच.आय.व्ही., हिप्याटायटिस बी टेस्ट करून घेणे खूपच उपयुक्त ठरते. नवरा-बायकोचा रक्तगट एक असल्यास खूप जण घाबरतात. पण त्याचा गर्भधाराणेवर काही परिणाम होत नाही. शक्यतो नात्यामध्ये लग्न करणे टाळावे. कारण काही अनुवंशिक दोष बाळात येण्याची शक्यता असते. मुलीने लग्नाआधी किंवा गर्भधारणेच्या आधी रुबेला ची लस टोचून घ्यावी.
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीनुसार अजूनही पहिले मुल हा मुलगाच व्हावा, अशी एक सर्वसाधारण धारणा पहावयाला मिळते. त्यामुळे गर्भधारणा समदिनी व्हावी, उजव्या किंवा डाव्या बाजुच्या बिजामुळे व्हावी अशा काही गैरसमजुती असतात. त्याला काही शास्त्रीय पुरावा नाही. चायनीस कॅलेंडर वगैरे बघणे, नाकात औषध घालणे, पोटात औषधे घेणे वगैरे सगळे अशास्त्रीय आहे. त्याला कोणी बळी पडू नये.
गर्भधारणा होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे आपल्याला गर्भधारणा झाल्यावर खूप खर्च येईल किंवा आपले करियर सोडावे लागेल असे वाटते. पण नीट समजून गर्भधारणा केली तर तसे काहीच होत नाही.
मासिक पाळी चुकल्यावर साधारण १० ते १५ दिवसांत डॉक्टरांना दाखून पुढील सल्ला घ्यावा. गोळ्या खाल्यावर मुल मोठे होते; मग सिझेरियन होते अशा गैरसमजुतीमुळे बरेच लोक काहीतरी गुंतागुंत होईपर्यंत डॉक्टरकडे येत नाहीत. तसे काहीच नसते. उलट काही औषधे उदा. फोलिक असिड, लोह, कॅल्शियम हे घटक बाळ व्यंग होण्यापासून वाचवतात व चांगले सुधृद बाळ होण्यास मदत करतात. म्हणून गर्भधाराणेकडे डोळस व शास्त्रीय नजरेतून बघितले तर बऱ्याच गुंतागुंतीतून मुक्त होऊन आपण एक सुधृद, चांगले मुल जन्माला घालू शकतो.
--डॉ. सरोज शिंदे, कोल्हापूर