हॄदय हे अविरतपणे संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करत असते हे सर्वविदितच आहे. प्रत्येक अवयवाचे कार्य, प्रत्येक स्नायूचे कार्य, प्रत्येक हालचाल हॄदयातून आलेल्या शुद्ध रक्तातून मिळलेल्या शक्तीतून होत असते. साहजिकच संपुर्ण शरीराला रक्त पुर्विणार्या हॄदयालाही काम करण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते. हॄदयाला रक्त पुरविणार्या रक्तवाहिन्याही (करोनरी आर्टरीज्) असतात. या रक्तवाहिन्या काही कारणामुळे जाड झाल्याने किंवा त्यांच्यामधे अडथळा निर्माण झाल्याने हॄदयाला होणारा रक्तपुर्वठा कमी झाला किंवा थांबला की हॄदयाच्या त्या विशिष्ट भागाला रक्त व रक्तातून मिळणारी शक्ती मिळत नाही व हॄदयाचा तो भाग निकामी होतो. याचा परिणाम म्हणुन हॄदयाच्या ठिकाणी तीव्र वेदना होतात, कैक वेळेला या वेदना डाव्या हाताकडे पसरतात, छातीत जड वाटते, घाम येतो, दम लागतो, अस्वस्थता जाणवते. अशी लक्षणे घेऊन व्यक्ती दवाखान्यात गेली की डॉक्टर 'हार्ट अॅटॅक' असे निदान करतात.
झटक्याची तीव्रता जेवढी जास्ती तेवढा प्राणाला धोका अधिक असतो, त्यामुळे या प्रकारची लक्षणे दिसू लागताच ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रत्येक क्षण मोलाचा आहे हे ओळखून त्वरित आवश्यक ती पावले उचलावीत.
वर आपण हार्ट अॅटॅकची सामान्य लक्षणे पाहिली. ही लक्षणे अनेकदा कमी अधिक होऊ शकतात. काही लोकांना छातीत दुखत नाही, तर फक्त घाम येतो, चक्कर येते. तरीहि तपासल्यानंतर 'हार्ट अॅटॅक' येऊन गेल्याचे निश्चित होते. तर क्वचित असेही दिसते की पुर्वी हार्ट अॅटॅक आला होता, असे डॉक्टरच रोग्याला सांगतात, रोग्याला मत्र त्याप्रकारचा काहीही त्रास जाणवलेला नसतो.
हार्ट अॅटॅक आला असता उदभविणारी आत्ययिक अवस्था (इमर्जन्सी) यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी आवश्यकता असल्यास आधुनिक विज्ञानाने सांगितलेले 'कार्डियाक मसाज' किंवा ताबडतोब ऑक्सिजन देणे वगैरे उपचार करावयासही हरकत नाही. मात्र एकदा इमर्जन्सी आटोक्यात आली की हॄदयरोग व्हायचे मूळा कारण शोधावे. 'निदानं परिवर्जनम्' या तत्त्वाला अनुसरून ती कारणे कटाक्षाने टाळावीत व हॄदयरोगाची संप्राप्ती जाणून घेऊन त्याला अनुसरून हॄदयरोग बरा होण्यासाठी योग्य उपचार सुरू करावेत.
हॄदयाचा झटका आल्यावर
- प्रथम काही दिवस म्हणजे साधारणतः दोन आठवडे विश्रांती घ्यावी, त्यानंतर जमेल, सोसवेल तेवढे थोडे थोडे हिंडणे, फिरणे सुरू करावे. मात्र हॄदयावर ताणयेईल अशा गोष्टी निश्चित टाळाव्यात.
- आहार पचावयास हलका, ताजा व सात्त्विक असावा. तेलकाट मसालेदार तसेच चवळी, पावटा, आदी वातवर्धक रुक्ष पदार्थ खाणे टाळावे.
- अंडे खाऊ नये. इतर मांसाहारही शक्यतॉ करू नये किंवा अगदीच मासाहार करायचा असल्यास केवळ मांसरस म्हणजे सूप घ्यावे.
- कच्चे मीठ खाऊ नये म्हणजे वरून मीठ घ्यायची सवय नसावी. तसेच खारट अन्नपदार्थ खाणे टाळावे.
- पोटाला तडस लागेपर्यंत जेवू नये. रात्री उशिरा व जडजेवण करू नये.
- जेवणानंतर, विशेषतः दुपारच्या जेवणानंतर विश्रांती घ्यावी. विश्रांती याचा अर्थ झोप नव्हे, तर जेवणानंतर आरामखुर्चीत बसावे, किंवा झोप येणार नाही अशा बेताने वामकुक्षी करावी. जेवणानंतर लगेच फिरायला जाणे, प्रवास करणे किंवा जोरजोराने बोलणे इत्यादी थकायला लावणार्या गोष्टी पूर्ण टाळाव्यात.
- आहार व आचरणामध्ये नियमितता आणाअवी, रात्री पुरेसे तास व योग्य वेळी झोपून योग्य वेळी उठावे.
- सुरूवातीला घरातल्या घरात किंवा गच्चीत वगैरे चालावे. हळूहळू चालण्याची क्षमता वाढली की मग बागेत, समुद्रावर वगैरे ठिकाणी कमीत कमी ३०-४० मिनिटे नियमित चालण्याची सवय ठेवावी.
- हॄदय हे मनाचे स्थान असल्याने मन प्रसन्न, शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. धसका बसेल, भीती वाटेल असे प्रसंग टाळावेत. विशेषतः अशा प्रकारचे वाचन, टीव्हीवरील मालिका वगैरे मुळीच पाहू नयेत.
- मनाबरोबर हॄदय ओजाचेही स्थान असल्याने ओजाला शक्ति मिळेल अशी आहारद्रव्ये सेवन करावीत. उदा. दूध, घरी बनवलेले साजूक तूप, घरी बनवलेले ताजे लोणी-खडीसाखर, रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम, अशा पौष्टिक गोष्टींचा आहारात सामावेश असू द्यावा. कोलेस्टेरॉल वाढेल व वजन वाढेल, पुन्हा हार्ट अॅटॅक येईलया भीतीने या ओजवर्धक, हॄदयाला पोषक गोष्टींपासून हॄदयाला व स्वत:ला वंचित ठेवू नये. वर उल्लेखिलेले लोणी व तूप हे योग्य पद्धतीने बनवलेले असल्यास व ते योग्य स्वरूपात व योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याने अपाय तर दूरच पण अप्रतिम आश्चर्यकारक फायदाच होतो हा आजवर असंख्य रुग्णांचा अनुभव आहे.
- धूम्रपान पूर्ण बंद करावे, तंबाखू खाऊ नये.
एकदा हॄदयविकाराचा झटका येऊन गेला की हॄदयाच विशिष्ट थोडासा भाग निकामी होतो. त्यामुळे उर्वरित आयुष्यभर त्या व्यक्तीला स्वतःच्या हॄदयाची काळजी घेणे भाग असते. तसेच पुन्हा हार्ट अॅटॅक येऊ न देणे ही सुद्धा अत्यंत आवश्यक गोष्ट होय. कारण प्रत्येक अॅटॅकमध्ये हॄदयाचा अधिकाधिक भाग निकामी होत जातो व हॄदयाची ताकद कमी कमी होत जाते व एकंदरीतच प्राण धोक्यात येण्याचे प्रमाण वाढत जाते. हार्ट अॅटॅक आल्यानंतर हॄदयाला रक्तपुरवठा करणार्या वाहिन्यांतीलकडकपणा किंवा त्यांच्यातील अडथळा दूर करण्यासाठीही योग्य उपचार करावे लागतात. आजकाल शस्त्रक्रीयेद्वारे ''अँजिओप्लास्टी' किंवा 'बायपास'ने ब्लॉकेजेस दूर करता येऊ शकतात. मात्र, हे ब्लॉकेजेस बन्वण्याची शरीराची सवय न मोडल्यास बहुतेक वेळेला पुन्हा पुन्हा ब्लॉकेजेस होताना दिसतात.
योग्य पद्धतीने केलेले आयुर्वेदिक पंचकर्म, हद्बस्ती, बस्ती इत्यदि उपचार, आहार-विहारात आवश्यक ते बदल व वैद्यांच्या सल्ल्याने प्रकॄतीनुरूप घेतलेली आयुर्वेदिक औषधे यांच्या सहाय्याने हार्ट अॅटॅक व हॄदयरोगावर पूर्णपणे विजय मिळवलेले असंख्य रुग्ण आज निरोगी आयुष्य जगत आहेत.
सध्या पंचकर्म हा शब्द रूढ झालेला दिसतो. बर्याच वेळा नुसते तेल लावणे, शेक करणे,बाष्प स्नान, शिरोधारा, पिडिंचिल वगैरे गोष्टीच पंचकर्माच्या नावाखाली केल्या जातात. फक्त मीठाचे पाणी पाजून उलटी करव णे म्हणजे वमन, तर रात्री एखादे जुलाबाचे औषध देणे म्हणजे विरेचन असे या पंचकर्माचे स्वरुप असते. परंतु हॄदयरोगाच्या रोग्यांच्या बाबतीत असे पंचकर्म कामाचे नाही. पंचकर्मातील घॄतपान म्हणजे औषधींनी स्निग्ध घॄत प्यावयास देणे ही एक महत्त्वाची क्रिया करावी लागते. प्रकॄती, हॄदयरोगाचा प्रकार, रुग्णाची शक्ती वगैरे गोष्टींचा नीट अभ्यास करुन घॄताची मात्रा, घॄतपानाचे दिवस वगैरे गोष्टी ठरवाव्या लागतात.
याप्रकारे योग्य प्रकारे घॄतपान करून विधिपूर्वक पंचकर्म केले तरच शरीरातील बहुतांशी आमद्रव्ये, विषद्रव्ये शरीराबाहेर निघू शकतात, ज्यायोगे रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होण्याची क्रिया सुरू होऊ शकते, हॄदयाच्या वाहिन्या व स्नायूंना आलेले काठिण्य हळूहळू कमी होऊ लागते. तेव्हा हॄदयरोगात असे पूर्वकर्मोत्तर विधिपूर्वक केलेले पंचकर्मच उपयोगी पडते हे लक्षात असू द्यावे अन्यथा पंचकर्म केले असे मानसिक समाधान हॄदयरोग्यांच्या बाबतीत चालणार नाही.
हे उपचार शस्त्रक्रियेपूर्वी केले तर उत्तमच पण शस्त्रक्रीया होऊन गेल्यानंतरही पुनश्च ब्लॉक्स होऊ नयेत म्हणूनही यांचा उत्तम उपयोग होताना दिसतो. अॅटॅकच्या वेळेला खराब झालेले स्नायू कही अंशी पूर्ववत होऊ शकतात तसेच पुन्हा अॅटॅक येऊ नये एवढी शक्ती नक्कीच मिळू शकते.
हार्टअॅटॅक येऊच नेये म्हणून घ्यावयाची काळजी
- वयाच्या ४० वर्षानंतर खाण्या-पिण्याच्या सवयी हळूहळू बदलाव्यात. आयुष्यात नियमितता आणण्याचा प्रयत्न करावा.
- रोज योगासनांचा अभ्यास करावा. कमीत कमी १२ सूर्यनमस्कार रोज घालावेत. ३५ ते ४० मिनिटे चालायला जावे.
- स्वतःला सोसवेल एवढेच शारीरिक श्रम करावेत. रात्र-रात्र जागरणे करू नयेत.
- स्वतःला सहज पेलवेल एतकीच जबाबदारी अंगावर घ्यावी. पैशासाठी किंवा प्रतिष्ठेपायी काम वाढवून ठेवू नये.
- कामामुळे कितीही व्यस्तता असली तरी रोज थोडावेळ स्वतःसाठी काढण्याची सवय ठेवावी. या वेळेत मन रमेल अशा काही गोष्टी कराव्यात. काही छंद असल्यास त्यात मन रमवावे. डोळे मिटून शांत बसावे, योगनिद्रा किंवा 'स्पिरीट ओफ हार्मनी' सारखे मनःशान्ती देणारे स्वास्थ्यसंगीत ऐकावे.
- अकारण काळजी करणे बंद करावे. मनावरचा ताण कोणत्या ना कोणत्या मार्गाने कमी करण्यासाठी प्रयत्नरत असावे.
- वजन फार वाढू देऊ नये. अर्थातच वेळीच योग्य उपचार करून वजन आटोक्यात ठेवावे.
- मलावष्टंभ होणार नाही यासाठी काळजी घ्यावी. गरज पडल्यास योग्य औषधे सुरू करावीत. अधूनमधून मॄदू विरेचन घ्यावे.
- तंबाखू, धुम्रपान, अफू, भांग आदी मादक द्रव्यांचे सेवन करू नये.
- मधुमेह, रक्तदाब वगैरे व्याधी असल्यास फक्त रोगाची लक्षणे दबवणारी नव्हे, तर रोग मुळापासून बरा करू शकणारी औषधे घ्यावीत. गोळ्या इंजेक्शन्स घेऊन त्रास होत नाही म्हणजे काळजी करण्याचे (त्त्याहीपेक्षा काळजी घेण्याचे) कारण नाही अशा भ्रमात राहू नये.
- घरात कुणाला म्हणजे आई-वडील, भाऊ-बहीण यापैकी कुणाला हार्ट अॅटॅक येऊन गेला असल्यास खालील लक्षणांवर लक्ष ठेवावे.
- अकारण छातीत धडधडणे
- चालले किंवा जिने चढले की दम लागणे.
- जेवणानंतर छातीत जड झाल्यासारखे वाटणे.
- रात्री अचानक छाती आवळली गेल्यासारखे वाटणे
- अचानक छातीत काही काळासाठी दुखणे व नंतर आपोआप बरे वटणे.
अशी लक्षणे दिसत असल्यास तज्ज्ञ वैद्यांकडे जाऊन रक्ताभिसरण व हॄदयाची स्थिती योग्य आहे ना याची तपासणी करून घ्यावी. नाडीपरीक्षणावरुन आणि इतर आयुर्वेदिक अष्टविध परीक्षा पद्धतींच्या सहाय्याने अनुभवी वैद्यहे सांगू शकतात. साधारणतः काही दिवसांनंतर जो त्रास उत्पन्न होऊ शकतोत्याचे निदान अशा आयुर्वेदिक निदान पद्धतीने अगोदरच करता येऊ शकते. 'स्ट्रेस टेस्ट' करून घेतल्यासही रक्ताभिसरण, हॄदयाची स्थिती यांचा अंदाज येऊ शकतो. वेळीच परीक्षणे करून योग्य ते उपचार सुरू करावेत.
डॉ. श्री. बालाजी तांबे